हिंगोलीकरांचा भारतरत्न नानाजी देशमुख यांचे कौतुक करण्यासाठी हात आखडता

nanaji-deshmukh
हिंगोली – मरणोत्तर जिल्ह्यातील रहिवासी नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचा आनंद केवळ त्यांच्या मूळगावी म्हणजे कडोळी येथेच साखर आणि पेढे वाटून साजरा करण्यात आला. पण देशमुख यांच्याबाबत जिल्ह्यात तेवढी माहितीच नसल्याने त्याचा साधा जल्लोषही जन्मगाव वगळता इतर कुठेही झाला नाही. हिंगोलीकरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हात आखडता घेतल्याचे दिसून येते.

हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथे ११ ऑक्टोबर १९१६ रोजी चंडिकादास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. एकदा गाव सोडल्यानंतर गावाकडे देशमुख यांनी कायमची पाठ फिरवली. आई-वडिलांचे छत्र बालपणीच हरवल्याने ते काही दिवस वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील आपली बहीण सखुबाई देशपांडे यांच्याकडे शिक्षणासाठी राहिल्यानंतर नांदेड येथे असलेल्या दुसऱ्या बहिणीकडे शिक्षणासाठी वयाच्या ११ व्या वर्षी गेले.

परत वाशिम येथे येऊन त्यांचे नातेवाईक असलेले आबा पाठक यांच्याजवळ शिक्षणासाठी थांबले. मिळेल ते काम करून देशमुख यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. त्यांना शिक्षणासाठी लहानपणापासूनच कुठेतरी बाहेरगावी जावे असे वाटत होते. त्याच दरम्यान १९३८ साली डॉ. हेडगेवार यांचे वाशिम याठिकाणी एक शिबिर झाले. देशमुख यांनी त्या शिबिरात स्वतःला झोकून देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. देशमुख यांच्या जीवनाला तेथूनच एक कलाटणी मिळाली. त्यांनी नातेवाईकांच्या प्रेमात न पडता देश आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच कर्मभूमी समजून समाजकार्यात सहभाग घेतला.

त्यांचे कार्य दिवसेंदिवस वाढत गेले. शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. पण एकदा हिंगोली जिल्हा सोडून गेलेले देशमुख पुन्हा जिल्ह्यात फिरून न आल्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती हिंगोलीकरांना फारशी राहिलीच नाही. देशमुख यांना आता मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाल्याने नानाजी नेमके कोण? त्यांनी काय काम केले? याबद्दल माहिती मिळण्यास सुरूवात झाली. त्यांची अनेक जण विविध ठिकाणी माहिती शोधत आहेत. महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वीच त्यांच्या नावाने ”नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना” राबवण्यास सुरुवात केली आहे.

शासनाने देशमुख यांच्या कार्याची दखल घेतली असली तरीही पुरस्कार मिळण्यापूर्वी देशमुख कोण होते? हे जेमतेम हिंगोलीकरांनाच माहीत असल्यामुळेच त्यांचे मूळ गाव वगळता कुठेही त्यांच्या कार्याचा गौरव केला नाही. तसेच नानाजी देशमुख यांना मरणोत्तर मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराची कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांनीदेखील दखल घेतली नाही. तसेच कुठे साधी फलकबाजीदेखील करण्यात आली नाही.

शासन हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावे योजना राबवते व भारतरत्न पुरस्कारही देते. पण हिंगोलीकरांना त्याचे काहीही विशेष वाटले नसल्याचे दिसून येते. विशिष्ट विचारसरणीचे नानाजी देशमुख यांना लागलेले लेबल किंवा त्यांची विशिष्ट समाज घटकाचे व्यक्ती असल्याची ओळख हेच आनंद साजरा न करण्यामागचे कारण नसेल ना? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. जिल्ह्यात आजही कुठेही बॅनरद्वारे शासनाचे साधे आभार मानल्याचेही दिसून येत नाही हे विशेष! मात्र जिल्ह्यात इतर पुरस्कारांची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचे पाहावयास मिळते.

Leave a Comment