आता युरोपातही नोटाबंदी – जर्मनी, ऑस्ट्रिया वगळता 500 युरोच्या नोटा बंद

nota
कर चुकवेगिरी, गुन्हेगारी आणि अगदी दहशतवादासाठी वापर होत असल्याच्या कारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. आता युरोपातही याच कारणावरून 500 युरोच्या नोटा बंद करण्यात येत आहे. केवळ जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन देशांनी या नोटांचा वापर सुरू ठेवला आहे. मात्र येत्या एप्रिलपासून तेथेही या नोटा बंद होणार आहेत.

युरोझोनमधील 17 केंद्रीय बँकांनी रविवारपासून अधिकृतपणे 500 युरोच्या नोटा देणे बंद केले. मात्र डॉईट्शे बुन्डेस्बँक आणि ऑस्ट्रियाची ऑस्टरराईशिसे नॅशनलबँक या दोन बँकां या नोटा देणार आहेत. सहज संक्रमण आणि तांत्रिक कारणामुळे या बँका 26 एप्रिलपर्यंत या नोटांचा वापर चालू ठेवणार आहेत.

कर चुकवेगिरी आणि गुन्हेगारी कारवायांसाठी मोठ्या नोटांचा वापर होत असल्यामुळे या नोटा रद्द करण्याची मागणी युरोझोनच्या अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून केली होती. त्यामुळे युरोपियन सेंट्रल बँकेने 2016 मध्ये जास्त किमतीच्या नोटा देणे बंद केले होते.

मात्र या नोटांच्या तुटवड्यामुळे बँका आणि सरकारांना रोकड रकमेचा तुटवडा जाणवेल तसेच गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात येईल, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. जर्मनीतील माध्यमांनीही या निर्णयावर टीका केली आहे.
युरोपीय केंद्रीय बँकेच्या अंदाजानुसार, 500 युरोच्या 5 कोटी 20 लाख नोटा चलनात आहेत.

Leave a Comment