जपान हा एक आगळावेगळा देश आहे. तेथील संस्कृतीही वेगळी आहे आणि आजच्या आधुनिक युगातही संस्कृतीचे पालन करण्याबाबत जपानी तत्पर असतात. जपान मध्ये नोकरी सोडणे हे संस्कृतीत बसत नाही त्यामुळे कर्मचारी स्वतः राजीनामा देणे टाळतात. अर्थात आजची पिढी अनके संधी उपलब्ध असल्याने एकाच नोकरीत टिकणे अवघड आहे याची प्रचीती जगभर येते आहे. पण जपानी कर्मचारी नोकरी सोडायची झालीच तर स्वतः न सांगता या कामासाठी एजन्सीची मदत घेतात. अश्या सुमारे ४०० एजन्सी जपानमध्ये सध्या सुरु आहेत.
नोकरीचा राजीनामा देणे जपानी संस्कृतीच्या विरोधात
जपानी कर्मचाऱ्याला नेहमीच बॉस आपल्याला राजीनामा देऊ देणार नाही अशी भीती असते. कारण ते त्यांच्या संस्कृतीशी जोडले गेले आहे. केवळ नोकरीच नाही तर कोणत्याची कामाचा राजीनामा देणे तेथे चांगले मानले जात नाही. त्यामुळे नोकरी सोडू इच्छिणारे अश्या एजन्सीज ची मदत घेतात. त्यासाठी ५० हजार येन मोजले जातात आणि मग हि एजन्सी कर्मचार्याच्या वतीने कंपनीशी बोलणी करते.
अनेकदा असेही घडते कि कंपनी राजीनामा स्वीकारत नाही मग हे लोक कंपनीपासून सुटका करून घेण्यासाठी ते मृत झाल्याचे जाहीर करतात. जपानमध्ये बहुतेक सर्व नोकरदार आयुष्यभर एकाच नोकरीत राहतात मात्र आजकाल नोकरी बदलण्याचा ट्रेंड वाढत चालला असल्याने अश्या मध्यस्त संस्थाना चांगले दिवस आले आहेत. जपान मध्ये तरुण लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे कुशल कर्मचारी मिळत नाहीत परिणामी कंपन्या राजीनामे स्वीकारण्यास तयार होत नाहीत. नोकरीतून अचानक गायब व्हायचे आणि पुन्हा कामावर यायचेच नाही हा प्रकार तेथे वाढत चालला असून त्याला वर्क प्लेस घोस्टिंग असे नाव आहे.