जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड डिक्शनरीने सलग दुसऱ्या वर्षी वर्षाचा हिंदी शब्द जाहीर केला असून 2018 या वर्षासाठी हा मान ‘नारी शक्ती’ या शब्दाला मिळाला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या वतीने शनिवारी या शब्दाची घोषणा करण्यात आली.
‘नारी शक्ती’ ठरला ‘ऑक्सफोर्ड’चा 2018 वर्षाचा हिंदी शब्द
जयपूर येथे दिग्गी पॅलेस येथे सुरू अललेल्या जयपूर साहित्य महोत्सवातील (जेएलएफ) एका सत्रात ही घोषणा करण्यात आली. या शब्दाचे मूळ संस्कृत भाषेत असून आज स्त्रियांनी स्वतःच्या जीवनाचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून तो वापरला जातो, असे ऑक्सफोर्ड डिक्शनरीने म्हटले आहे. निकीता गोखले, रणधीर ठाकूर, क्रितिका अग्रवाल आणि सौरभ द्विवेदी यांच्यासह अन्य भाषा तज्ज्ञांच्या सल्लागार समितीच्या मदतीने ऑक्सफोर्ड डिक्शनरी (इंडिया) संस्थेने या शब्दाची निवड केली.
“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारत सरकारने देऊ केलेल्या नारी शक्ती पुरस्काराच्या निमित्ताने मार्च 2018 मध्ये ‘नारी शक्ती’ शब्दाच्या वापरात मोठी वाढ झाली. या शब्दाभोवती मोठी चर्चा झाली,” असे संस्थेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“नारी शक्ती या शब्दात आपल्या काळातील भावना, आव्हाने व विजयांचे प्रतिबिंब आहे, ,” असे गोखले यांनी सांगितल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गोखले या जेएलएफच्या संचालकही आहेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘आधार’ हा 2017 वर्षाचा हिंदी शब्द म्हणून जाहीर केला होता.