स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळील मगरींना हलविणार, पर्यावरणवाद्यांचे आक्षेप

Statue
जगातील सर्वात मोठा पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळील जलाशयातून शेकडो मगरींना हलविण्याचे काम अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. मात्र यामुळे पर्यावरणवाद्यांमध्ये खळबळ उडाली असून या मगरींच्या कल्याणाबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली आहे.

गुजरातमध्ये नर्मदा धरणाच्या जलाशयात असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये झाले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाच्या या 597 फूट उंच पुतळ्यापर्यंत पर्यटकांना वाहून नेण्यासाठी सीप्लेन सेवेला परवानगी देण्यात आली आहे. तेथे या सीप्लेनला उतरण्यासाठी मगरींना हलविण्यात येणार आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य सरकारने मगरींना हलविण्याचे आदेश दिले आहेत, असे स्थानिक वन खात्याच्या अधिकारी अनुराधा साहू यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले.

येथील किमान 15 मगरींना या आधीच पिंजऱ्यात टाकून इतरत्र हलविण्यात आले आहे, मात्र शेकडो मगरी अद्याप या ठिकाणी आहेत, असे इंडियन एक्सप्रेसने म्हटले होते. मात्र पर्यावरणवादी आणि राजकीय नेत्यांनी यावर टीका केली आहे.

“आपल्या सर्वांचे डोके फिरले आहे का,” असा प्रश्न पर्यावरणविषयक नियतकालिक सँक्च्युअरी एशियाचे संपादक बिट्टू सहगल यांनी ट्विट केले. तर “कोणताही पर्यावरणतज्ञ आपल्याला हे सांगेल की, हा शुद्ध वेडेपणा आहे,” असे पत्रकार आणि कार्यकर्ते प्रीतीश नंदी म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनेही या निर्णयावर टीका केली आहे.

भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 1 अंतर्गत परिशिष्ट 1 मध्ये मगरींना संरक्षित प्रजातीचा दर्जा देण्यात आला आहे.

Leave a Comment