शटडाऊनमुळे ट्रम्प यांचे देशाला उद्देशून भाषणही स्थगित

Donald-Trump
अमेरिकेत सुरू असलेले शटडाऊन संपत होत नाही तोपर्यंत आपले देशाला उद्देशून असलेले भाषण स्थगित करण्याचा निर्णय अध्यक्ष ट्रम्प यांनी घेतला आहे.
अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेजवळ भिंत बांधण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा हट्ट आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्षामध्ये मतभेद आहेत. या मुद्द्यावरून 28 डिसेंबरपासून अमेरिकेत सरकारचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे आपले स्टेट ऑफ द युनियन भाषण काही दिवस पुढे ढकलणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकी संसदेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांना दिलेले स्टेट ऑफ द युनियन भाषणाचे निमंत्रण बुधवारी रद्द केले होते. सरकारी सेवा प्रथम पूर्णपणे उघडल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. या भाषणाची पुढील तारीख ठरविण्याचा अधिकार पेलोसी यांचा आहे, असे ट्रम्प म्हटले.

“शटडाउन सुरू असताना नॅन्सी पेलोसी यांनी मला भाषणाचे निमंत्रण दिले. मी संमती दिली. त्यानंतर शटडाऊनमुळे त्यांनी विचार बदलला आणि दुसरी तारीख सुचविली. हा त्यांचा अधिकार आहे – शटडाऊन संपल्यानंतर मी भाषण करेन,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षातील वादामुळे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन झाले आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ट्रम्प यांनी 5.7 अब्ज अमेरिकी डॉलर निधीची मागणी केली आहे. त्याला डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिला आहे. त्यामुळे 22 डिसेंबरपासून केंद्र सरकारचे आठ लाख
कर्मचारी विना वेतन काम करत आहेत.

Leave a Comment