दमदार आणि वाखण्याजोगा कंगनाचा मणिकर्णिका

manikarnika
बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत हिने ‘खूब लडी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी’ कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांच्या या ओळी मोठ्या पड्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही अंमलात आणल्या आहेत. या दरम्यान अनेक वाद झाले, अनेक अडचणी आल्यात, पण आपला स्वप्नवत प्रोजेक्ट ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ कंगनाने अखेर पूर्ण केला. राणी लक्ष्मी बाईंची शौर्यगाथा इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आणि अवघ्या काही तासांच्या चित्रपटातून त्याच पराक्रमाला साकारण्याचे शिवधनुष्य राधा कृष्ण जगरालमुडी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी पेलले. यात खुद्द कंगना राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तिरेखा व्यक्तीरेखेत सर्वांसमक्ष आली आणि तिच्यासाठीच राणीची भूमिका लिहिली गेली होती की काय? हा प्रश्न सर्वांना पडला. किंबहुना तिनेच राणी साकारावी हे त्यावरचे उत्तरही सापडले.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटात बिठुरमध्ये पेशवांच्या संस्कारांमध्ये संगोपन झालेल्या, क्षत्रिय नसूनही एखाद्या मुरब्बी योद्ध्याप्रमाणे वावरणाऱ्या मणिकर्णिकेचा झाशीच्या राणीपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर स्वातंत्र्यसंग्रामातील धगधगती मशाल इथवरचा प्रवास साकारण्यात आला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्या आवाजात कथेची पार्श्वभूमी आपल्या कानांवर पडते, चित्रपटातील बऱ्याच दृश्यांमध्ये योद्ध्याचं काळीज असणारी व्यक्तीरेखा साकारणारी कंगना राणावत प्रशंसेस पात्र ठरते. तिने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने जिंकते. चित्रपटात कंगनाने अविश्वसनीय साहस, देशाभिमान, डोळ्यातील क्रोधाग्नी, त्याआड दडलेली मातृत्वाची भावना, पत्नी म्हणून मनात होणारा कोलाहल आणि एक राणी म्हणून खांद्यावर असणारी जबाबदारी असे सर्व धागे एकत्र आणले आहेत. पती, राजा गंगाधर राव यांच्या निधनानंतर केशवपनाचा विरोध करण्यापासून झाशीच्या हितासाठी सिंहासनावर आरुढ होण्याची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत.

चित्रपटात कंगनाला सहकलाकारांची साथ मिळाली आहे . जिसू सेनगुप्ता (गंगाधर राव), अतुल कुलकर्णी (तात्या टोपे), अंकिता लोखंडे (झलकारीबाई), डॅनी डँग्जोपा (गुलाम गौस खान) यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यक्तीरेखा सुरेखपणे बजावल्या आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध जास्त वेळखाऊ असल्याचे वाटते. तर, उत्तरार्धात बऱ्याच अंशी चित्र बदलते, रणसंग्रामातील राणी कशी होती, याचा आधार घेत कथानक वेग पकडते. ‘मणिकर्णिका…’तील गीतांना शंकर- एहसान- लॉय या त्रिकूटाने संगीत दिले आहे.

Leave a Comment