मध्य प्रदेशातील शेतकऱ्याला 13 रुपयांची कर्जमाफी!

farmer
मध्य प्रदेशातील नवीन सरकारने गाजावाजा करून कर्जमाफी केली खरी, परंतु शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली आहे. राज्यातील एका शेतकऱ्याला केवळ 13 रुपयांची कर्जमाफी मिळाल्यामुळे या घोषणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

राज्यात नवीन आलेल्या मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारने या महिन्याच्या सुरूवातीला कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्ला दोन लाख रुपयांपर्यंतची माफी देण्यात येणार होती.

मात्र अगर मालवा जिल्ह्यातील शिवलाल कटारिया याला आपल्या कर्जमाफीचा आकडा ऐकून धक्काच बसला. आता त्याने हे प्रकरण सरकार दरबारी नेले असून न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.

शिवलाल हा 55 वर्षाचा असून काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत त्याला 23,815 रुपयांची कर्जमाफी मिळणार होती. मात्र प्रत्यक्षात त्याला 13 रुपयांची कर्जमाफी मिळाली.

“पंचायतीत लाभार्थ्यांची यादी आहे, मी ती पाहिली. त्यात म्हटले आहे, की 23,815 रुपयांऐवजी माझे 13 रुपयांचे कर्ज माफ झाले आहे,” असे शिवलाल याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. आपण आपल्या एकुलत्या एका मुलाच्या कुटुंबासह दोन एकराच्या जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊन उपजीविका चालवतो, असे त्याने सांगितले.
दरम्यान, आपण या प्रकरणात लक्ष घालू, असे अगर मालवाचे जिल्हाधिकारी अजय गुप्ता यांनी सांगितले.

Leave a Comment