जनुक सुधारणा केलेल्या पाच माकडांचे चीनमध्ये क्लोनिंग!

monkey
जनुक (जीन) संपादन केलेल्या पाच माकडांचे चीनमधील शास्त्रज्ञांनी क्लोनिंग केले आहे. मनुष्यांमधील रोगांवर संशोधन करण्यासाठी या माकडांचा उपयोग करण्यात येणार आहे. यामुळे नैतिकतेबद्दल नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एका “अनधिकृत प्रयोगा”तून जगातील पहिल्या जनुक-संपादीत मानवी बाळाचा चीनमध्ये जन्म झाल्याची पुष्टी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे वैज्ञानिक समुदायात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. चीनमधील प्रमुख अशा नॅशनल सायन्स रिव्ह्यू या इंग्रजी नियतकालिकात दोन लेखांद्वारे चिनी शास्त्रज्ञांनी गुरुवारी या शोधाची घोषणा केली.

सर्कॅडियन रिदम विकार असलेल्या एका जनुक-संपादीत माकडापासून क्लोनिंग करून शास्त्रज्ञांनी पाच माकडांना जन्म दिला आहे. हा विकार झोपेच्या समस्या, नैराश्य आणि अल्झायमर रोगाशी निगडित आहे, असे चीनच्या सरकारी झिन्हुआ वृत्तसंस्थेने गुरुवारी सांगितले. शांघाय येथील चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्समध्ये या क्लोन झालेल्या माकडांचा जन्म झाला.

जैव-वैद्यकीय संशोधनासाठी जनुक-संपादीत माकडापासून अनेक क्लोन तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असा दावा झिन्हुआने केला आहे.यापूर्वी अशा रोगांच्या संशोधनासाठी उंदीर आणि माशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता, परंतु दैनंदिन कार्य, मेंदूची संरचना आणि चयापचयाचा दर या दृष्टीने हे प्राणी मनुष्यांपेक्षा खूप वेगळे असतात. त्यामुळे माकडांचा वापर करण्याची शास्त्रज्ञांची योजना आहे.

Leave a Comment