डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणात उतरणार ‘कॅप्टन कूल’ !

mahendra-singh-dhoni
मुंबई : डब्ल्यूडब्ल्यूईमधील रॉयल रम्बल हा वर्षातील सर्वात मोठा दुसरा इव्हेंट असतो. मोठमोठे सुपरस्टार पुढील रविवारी होणाऱ्या या लढतीत जेतेपदासाठी भिडतील. याचदरम्यान या प्रतिष्ठेच्या किताबासाठी पुरुषांप्रमाणे महिलांतही चुरस रंगणार आहे. हा इव्हेंट डब्ल्यूडब्ल्यूईच्या चाहत्यांचे गेली अनेक वर्ष मनोरंजन करत आहे. पण यंदाचा रॉयल रम्बल सामना थोडा वेगळा आणि भारतीयांसाठी खास ठरणार आहे. यावेळी रॉयल रम्बलच्या रिंगणात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘ कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी दिसण्याची शक्यता आहे.

भारतीय चाहत्यांकडून यासाठी डब्ल्यूडब्ल्यूईने एक पोल मागवला आहे. धोनीला रॉयल रम्बल सामन्यात पाहायला तुम्हाला आवडेल का, असा सवाल त्यात त्यांनी केला आहे. या पोलला चाहत्यांनीही प्रतिसाद देताना डब्ल्यूडब्ल्यूई आयोजकांना होकार कळवला आहे.

याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्विटवर डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन ब्रॉक लेसनरचा मॅनेजर पॉल हेयमॅनने प्रतिक्रिया नोंदवली. ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेतील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कॅप्टन कूल धोनीचे कौतुक करणारे ते ट्विट होते. हेयमॅनने त्यावर प्रतिक्रिया नोंदवली. आयसीसीने त्याची दखल घेत हेयमॅन आणि लेसनर यांना चक्क वर्ल्ड कप तिकीट ऑफर केले होते. हेयमॅन त्यावर म्हणाला, डब्ल्यूडब्ल्यूई युनिव्हर्सल चॅम्पियनला वर्ल्ड कप स्पर्धेचा जागतिक स्तरावर प्रचार वाढवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना दाद देतो. तेथे येण्यासाठी तुम्ही आम्हाला आठ अंकी रक्कम द्याल अशी अपेक्षा.

Leave a Comment