मी पांड्या आणि राहुलला का बोलवले? करण जोहरला पश्चाताप

karan-johar
क्रिकेटर के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी ‘कॉफी विथ करण ‘कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्याविरोधात यानंतर बीसीसीआयने कडक कारवाई करत त्यांच्या खेळण्यावर बंदी आणली आहे. आपणच या प्रकाराला जबाबदार असल्याची खंत करण जोहरने व्यक्त केली आहे.

करण जोहर म्हणाला, मी स्वतःला यासाठी जबाबदार ठरवत आहे. कारण हा शो माझा होता. माझा प्लॅटफॉर्म होता. त्यांना पाहुणे म्हणून मी बोलावले होते. म्हणूनच या शोचे जे काही परिणाम होतील त्याला मी जबाबदार आहे. झालेल्या नुकसानीचा विचार करताना मला अनेक रात्री झोप लागलेली नाही. माझे बोलणे कोण ऐकून घेईल.

पुढे करण म्हणाला, अशी स्थिती आता आहे ज्यावर माझे काहीच नियंत्रण नाही. जे प्रश्न त्या दोघांना विचारले तेच प्रश्न मी शोवर आलेल्या इतरांना अगदी महिलांनाही विचारले होते. दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट शोवर आली होती हे प्रश्न त्यांनाही मी विचारले होते.

करण म्हणाला, प्रश्नांची जी उत्तरे येतात त्यावर माझे नियंत्रण नसते. शोमध्ये एक कंट्रोल रुम आहे ज्यामध्ये १६-१७ मुली असतात. कॉफी विथ करण शो पूर्णपणे महिला चालवतात आणि फक्त मी एकमेव पुरुष तेथे आहे. त्यातील कोणालाच हे खटकले नाही. प्रत्येकीने याबद्दल मस्करीत भाष्य केले. मला कोणीच याचे एडिटींग झाले पाहिजे हे न सांगितल्यामुळे मलाही तसेच वाटले. पांड्या आणि राहुलसोबत जे घडले त्याचा मला पश्चाताप वाटतो.

Leave a Comment