चित्रपट न पाहताच निघून गेले ‘ठाकरे’चे दिग्दर्शक अभिजीत पानसे

abhijeet-panse
बुधवारी सायंकाळी वरळी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील “ठाकरे’ या चित्रपटाचा प्रीमियर ठेवण्यात आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी मधूनच निघून गेले. त्यांची समजूत काढण्याचा निर्माते-खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न केला, पण चित्रपट न पाहताच पानसे तिथून निघाल्यामुळे या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मान-अपमानाचे नाट्य पाहायला मिळाले.

राजकारणातील अनेक मान्यवर या स्क्रिनिंगला उपस्थित होते. दिग्दर्शक अभिजीत पानसे येण्याआधीच चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरू करण्यात आले. निर्माते संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने पानसे यांना पहिल्या रांगेत बसविणे अपेक्षित होते. पण चित्रपटगृहात आल्यानंतर पानसे यांना व त्यांच्या बरोबरीच्या मंडळींना बसण्यासाठी योग्य जागा न ठेवल्याने ते नाराज होऊन निघून गेले. राऊत यांनी यावेळी पानसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पानसे चित्रपटगृहाबाहेर पडले. मला या चित्रपटाचा दिग्दर्शक या नात्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि निर्माते संजय राऊत यांच्याबरोबरीने बसवण्याची अपेक्षा होती. काही मंडळी माझ्याबरोबर होती. त्यांचीही बैठक व्यवस्था नीट केली नव्हती. असा अपमान दरवेळी सहन करून घेणार नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पानसे यांना चित्रपटाच्या प्रमोशनमधूनही डावल्याची चर्चा होती. पानसे चित्रपटाच्या म्युझिक लॉंचच्या वेळीही अनुपस्थित होते. राऊत यांना तेव्हा पानसे म्युझिक लॉंचला उपस्थित का नाहीत? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. तेव्हा ते “ठाकरे’च्याच मराठी डबिंगमध्ये व्यस्त असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. तेव्हापासूनच या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे बोलले जात होते.

Leave a Comment