गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीत येणार

shankar-singh-waghela
लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (एनसीपी) प्रवेश करणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते 29 जानेवारी रोजी अहमदाबाद येथे अधिकृत पक्षप्रवेश करतील.

वाघेला हे 79 वर्षांचे असून त्यांना एनसीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस पद देण्यात येणार आहे. एनसीपीचे राज्य अध्यक्ष जयंत बोस्की यांनी बुधवारी यूएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना याला दुजोरा दिला.

दीड वर्षापूर्वी राज्यसभेसाठी अहमद पटेल यांच्याविरोधात मतदान केल्यानंचक वाघेला आणि सात आमदारांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. या सात आमदारांमध्ये शंकरसिंह वाघेला यांचे चिरंजीव महेंद्रसिंह यांचाही समावेश होता. नंतर महेंद्रसिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा पक्ष काढला होता.

प्रस्तावित भाजपविरोधी महाआघाडीत समन्वयक म्हणून वाघेला काम करतील, असे बोस्की यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला सांगितले. वाघेला यांनी आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील, असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment