न्यूझीलंड दौऱ्यातील अखेरच्या दोन वनडे आणि तीन टी-20साठी रोहित शर्मा कर्णधार

rohit-sharma
मुंबई : न्यूझीलंड दौऱ्यातील अखेरच्या दोन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असून भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा यावेळी रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात अजूनही चार वन डे आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यापैकी दोन वन डे आणि तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. पण या सामन्यांसाठी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पर्यायी खेळाडूचा भारतीय संघात समावेश करण्यात येणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयच्या मते भारतात 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट फिट असणे आवश्यक आहे. 2018 पासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेट मालिकांमध्ये खेळतो आहे. विराटला आशिया चषक स्पर्धा वगळता एकाही सामन्यांमध्ये विश्रांती न मिळाल्यामुळे विराटला काही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

विराट कोहलीच्या टीम इंडियाने याआधी नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडचा आठ विकेट्स आणि 85 चेंडू राखून धुव्वा उडवत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयी सिलसिला न्यूझीलंड दौऱ्यातही कायम ठेवला आहे. या विजयासह टीम इंडियाने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Leave a Comment