खुल्या वर्गातील गरीबांना रेल्वे देणार 23,000 नोकऱ्या – पियूष गोयल

piyush-goyal
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार खुल्या वर्गातील गरीबांना नोकऱ्या देणारी भारतीय रेल्वे ही पहिली सरकारी संस्था ठरणार आहे. पुढील दोन वर्षांत रेल्वे 23,000 नोकऱ्या देणार आहे, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी सांगितले.

भारतीय रेल्वे पुढील सहा महिन्यांत 1.31 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार असून पुढच्या दोन वर्षांत सुमारे चार लाख अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल, असे गोयल यांनी नवी दिल्लीत सांगितले.

भारतीय रेल्वेची मंजूर कर्मचारी क्षमता ही 15,06,598 एवढी आहे, यापैकी 12,23,622 कर्मचारी सध्या कामावर असून उर्वरित 2,82,976 जागा रिक्त आहेत. रेल्वेतील 1,51,548 पदांची भरती होणार असून 1,31,428 पदे तरीही रिक्त राहतील, असे गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याचे पीटीआय वृत्तसंस्थांनी सांगितले.

सुमारे 53,000 आणि 46,000 रेल्वे कर्मचारी 2019 -20 आणि 2020-21 या दोन वर्षांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आणखी सुमारे 1 लाख जागा निर्माण होतील, असे गोय म्हणाले. पुढील दोन वर्षांत सुमारे 4 लाख नोकऱ्या देण्याची योजना रेल्वेने आखली आहे. “आम्ही आधीच नियोजन केले आहे जेणेकरून रेल्वेमध्ये कोणतीही जागा रिक्त राहणार नाही. जेव्हा कोणी निवृत्त होईल तेव्हा जागा भरल्या जातील. तसेच खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बळांसाठी 10 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारा रेल्वे हा पहिला सरकारी विभाग असेल. मात्र अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय आणि इतरांच्या विद्यमान आरक्षणाला बाधा पोचणार नाही,” असेही ते म्हणाले.

Leave a Comment