बिहारमध्येही काँग्रेसला धक्का – राजद दाखवणार महाआघाडीतून बाहेरचा रस्ता

rahul-gandhi
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने वाटा नाकारल्यानंतर बिहारमध्येही काँग्रेसला धक्का बसला आहे. राज्यात महाआघाडीच्या जागा वाटपात अडचण निर्माण झाली असून यावरून राष्ट्रीय जनता दल (राजद) काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखविण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये विरोधी महाआघाडीच्या जागा वाटपात पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने येथे 16 जागांची मागणी केली आहे आणि किमान 12 जागांशिवाय आपण तडजोड करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राजदने एक पर्यायी योजना तयार केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राजदने महाआघाडीतील छोट्या पक्षांना काँग्रेसशिवायच्या आघाडीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या 3 फेब्रुवारी रोजी पाटण्यात सभा घेणार आहेत. त्यापूर्वी हा मुद्दा मार्गी लागावा, असे महाआघाडीतील पक्षांचे म्हणणे असल्याचे जनसत्ता वृत्तपत्राने म्हटले आहे.

राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नुकतीच सपचे नेते अखिलेश यादव आणि बसपच्या नेत्या मायावती यांची भेट घेतली होती. काँग्रेसने आपली मागणी 12 जागांपेक्षा कमी केली नाही तर राजद गोपालगंजची जागा बीएसपीला देण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या. राजदने काँग्रेसला 7 ते 8 जागा देऊ केल्या आहेत.

Leave a Comment