निवडणूक 2019: आंध्र प्रदेशातही काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

andhra-pradesh
उत्तर प्रदेश पाठोपाठ आंध्र प्रदेशातही विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकट्याने लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. आंध्र प्रदेशातील आगामी राज्य विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाशी युती करण्यात येणार नाही, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

‘‘आम्ही सर्व 175 विधानसभा मतदारसंघ आणि 25 लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणुका लढविणार आहोत. तेलुगू देसमशी आमची युती केवळ राष्ट्रीय पातळीवर आहे. त्यामुळे आम्ही राज्यात युती करणार नाही,’’ असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी सांगितले.

बुधवारी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत चांडी म्हणाले, की निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा 31 जानेवारी रोजी बैठक होईल. मात्र युती करण्याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील, असे एपीसीसीचे अध्यक्ष एन. रघुवीर रेड्डी यांनी सांगितले.

यापूर्वी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आपसात युती करून जागा वाटप केल्यानंतर काँग्रेसने सर्व 80 जागा लढविण्याची घोषणा केली होती. तसेच निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस केले असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे.

Leave a Comment