ईव्हीएममुळे झाली नाही गौरी लंकेश यांची हत्या – बहिणीचा निर्वाळा

lankesh-gauri
कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणातून झाली नसल्याचा निर्वाळा त्यांची बहिण कविता लंकेश यांनी दिला आहे. गौरी लंकेश या ईव्हीएम हॅकिंगवर एक लेख लिहिणार होत्या, त्यामुळे त्यांची हत्या झाली असा दावा सय्यद शुजा नावाच्या हॅकरने केला होता.

‘‘मला याची माहिती आहे आणि हे पूर्णपणे खोटे आहे, असे मला वाटते. असे का सांगण्यात आले हे मला माहीत नाही. माझ्या बहिणीला यामुळे लक्ष्य करण्यात आले, असे मला जराही वाटत नाही,’’ असे कविता यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात 16 व्यक्तींना अटक केली असून दोन संशयित फरार आहेत.

आपण गौरी यांना भेटलो होतो आणि त्यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या साप्ताहिकात ईव्हीएमवर लेख प्रकाशित व्हावा, अशी त्यांची इच्छा होती, असे शुजा याने म्हटले होते. ही खोटी बातमी असून यात पडण्याची गरज नसल्याचे कविता यांनी सांगितले.

‘‘ही हत्या हा एक राजकीय कट होता मात्र माझा यावर विश्वास नाही. आतापर्यंत तपास योग्य दिशेने पुढे सरकत आहे,’’ असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment