या गावात घोड्यावरून येत नाही नवरदेव

barat
लग्न म्हटले कि घोड्यावर बसून मिरवणुकीने येणारा नवरदेव हे देशभरातील नेहमीच दृश्य आहे. राजस्थानातील सरदार शहर या गावात मात्र नवरदेव घोड्यावरून येत नाही. येथे हि प्रथा ४०० वर्षापासून अधिक काळ पाळली जाते आणि ती लोकदेवता दादाजी महाराज यांच्याशी संबंधित आहे.

असे सांगतात कि ६७५ वर्षापूर्वी पुलाराम सारण यांनी हे गाव वसविले आणि या गावात बहुतेक व्यापारी आहेत. ब्राह्मणही मोठ्या संख्येने आहेत. गावात देवी देवतांची अनेक मंदिरे आहेत. हे गाव पूर्वीपासून स्वतंत्र होते मात्र ४०० वर्षापूर्वी बिकानेरच्या तत्कालीन राजाने या गावाकडून कर मागितला. त्यावर उगाराम नावाच्या व्यक्तीने हे ब्राह्मण लोकांचे गाव आहे आणि त्यांची उपजीविका पूजा अर्चेवर चालते त्यामुळे कर घेऊ नये अशी विनंती केली.

राजाने ही विनंती मान्य केली नाही आणि त्याने सैन्यासह या गावावर आक्रमण केले तेव्हा कर म्हणून उगाराम यांनी स्वतःचे मस्तक कापून ते तबकात ठेऊन राजाला दिले. उगाराम घोड्यावर बसून राजाला सामोरे गेले होते. तेव्हापासून येथे लग्नासाठी नवरदेवाची घोड्यावरून वरात काढली जात नाही.

येथील लोकांनी उगाराम यांना देवतेचा दर्जा दिला आणि गावाच्या मध्यभागी यांचे मंदिर बांधले. तेथे मूर्ती नाही पण उगाराम यांच्या चरणपादुका आहेत. त्याचीच पूजा केली जाते. गावावर आलेले कोणतेही संकट दादाजी महाराज म्हणजे उगाराम निवारतात अशी नागरिकांची श्रद्धा आहे.

Leave a Comment