तेज प्रताप यादवांचे शत्रुघ्न सिन्हांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण

tejpratap-yadav
पाटना – भाजप सोडून शत्रुघ्न सिन्हा यांनी आमच्या पक्षात यावे, असे आवाहन राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी केले आहे. माझी आणि शत्रुघ्न सिन्हा यांची वारंवार भेट होत असते. मैत्रीपूर्ण असे आमच्यातील संबंध असून मी मुंबईत त्यांच्या घरीसुद्धा गेलो होतो. भाजपला रामराम ठोकून त्यांनी जनतेच्या दरबारात यावे, असे म्हणत त्यांनी सिन्हांना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.

तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी कोलकातामध्ये १९ जानेवारीला भरवलेल्या भाजपविरोधी महारॅलीत शत्रुघ्न सिन्हा यांनीसुद्धा हजेरी लावल्याने खळबळ उडाली होती. सिन्हांविरोधात त्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाने आंदोलन केले होते. योग्य ती कारवाई पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांवर केली जाईल, असे म्हणत भाजपने त्यांना संधीसाधू म्हटले होते.

शत्रुघ्न सिन्हांनी १९ जानेवारीच्या सभेत चक्क मोदींवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यादव यांनी सिन्हांना भाजप सोडून आपल्या पक्षात या, असे आवाहन केले आहे. आता यावर शत्रुघ्न सिन्हा काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Comment