पांड्या संघात नसल्यामुळे होत आहे संघाचे नुकसान – विराट कोहली

virat-kohli
मुंबई – हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना बीसीसीआयने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे निलंबित केले आहे. या दोघांना प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय भारतीय संघातून खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातून दोघांना माघारी बोलवण्यात आले. आता याबाबत कर्णधार विराट कोहलीने मत मांडले आहे.

याप्रकरणी विराट कोहली म्हणाला की, हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू संघात असायला हवा. संघात हार्दिक असल्यावर आम्ही २ वेगवान गोलंदाजासह सामन्यात खेळू शकतो. पण संघात पांड्या नसल्यामुळे आम्हाला एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह खेळावे लागते. पांड्या संघात नसल्यामुळे संघाचे नुकसान होते. पांड्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूत संघाला फायदा होतो.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. हार्दिक-राहुलची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. आता दोघांऐवजी संघात विजय शंकर आणि शुभमन गिल यांचा समावेश करण्यात आला आहे. विराटने याआधीही पांड्याची बाजू घेताना म्हटले होते की, पांड्याने केलेली विधाने आणि संघाचा काहीही सबंध नसल्यामुळे पांड्याला संघात स्थान दिले पाहिजे.

Leave a Comment