पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर भारताचा 8 गडी राखून विजय

shikhar-dhawan
नवी दिल्ली – भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर शिखर धवनने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडवर 8 गडी राखून मात केली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 156 धावांचे आव्हान भारताने 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. न्यूझीलंडला झटपट गुंडाळण्यात यशस्वी झाल्यानंतर, रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या जोडीने भारतीय डावाची धडाक्यात सुरुवात केली.

सामना मधल्या काही षटकांदरम्यान प्रखर सुर्यप्रकाराशामुळे थांबवण्यात आला होता. सामन्यातील एक षटक यामुळे कमी करुन भारताला विजयासाठी दिलेल्या आव्हानात एक धाव कमी करण्यात आली. दरम्यान रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतर माघारी परतल्यानंतर विराटच्या साथीने शिखरने भारतीय डावाला आकार दिला. शिखर धवनने यादरम्यान अर्धशतकही झळकावले, त्याने 75 धावा केल्या. विराट कोहलीनेही त्याला उत्तम साथ दिली, मात्र सामना जिंकायला अवघ्या काही धावा शिल्लक असताना तो झेलबाद होऊन माघारी परतला. सामनावीरचा पुरस्कार मोहम्मद शमीला देण्यात आला.

तत्पूर्वी भारताने मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला 157 धावांवर रोखले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरली. विल्यमसनने 81 चेंडूत 7 चौकारांसह 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर मोहम्मद शमीने 3 फलंदाजांना माघारी धाडले. या दोघांना युझवेंद्र चहलने 2 तर केदार जाधवने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

Leave a Comment