मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव करून देणार गंगा स्वच्छता अभियानाला निधी

narendra-modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या सुमारे 1900 भेटवस्तूंचा लिलाव करून त्यातून मिळणारा पैसा गंगा स्वच्छता अभियानाला देण्यात येणार आहे. सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

विविध देशांतून मिळालेल्या पेंटिंग, मूर्त्या, शाल, पगडी, जॅकेट आणि पारपंरिक वाद्य यांचा या वस्तूंमध्ये समावेश आहे. सध्या या वस्तू संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच या वस्तू www.pmmementos.gov.in या पोर्टलवरही पाहता येणार आहेत.

नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे येत्या 27 आणि 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता या वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईल. त्यातून उरलेल्या वस्तूंचा 29 आणि 30 जानेवारी रोजी ई-लिलाव होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

या वस्तूंच्या लिलावातून मिळणारा निधी नमामि गंगे या प्रकल्पाला देण्यात येणार आहे. “देशातील विविध व्यक्ती आणि संघटनांनी पंतप्रधानांना दिलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्याची आमची योजना आहे. यातील पैसा चांगल्या हेतूसाठी वापरण्यात येईल,” असे सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांनी हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राला सांगितले होते.

Leave a Comment