बीसीसीआयची निवड समिती ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर झाली मालामाल

BCCI
मुंबई – ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारत ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा पहिलाच संघ ठरल्यानंतर मंगळवारी बीसीसीआने घोषणा करताना निवड समितीच्या सदस्यांना २० लाख रुपयांचे बक्षिस घोषित केले आहे.

ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील विजय असे बक्षिस देण्याचे प्रमुख कारण दिले जात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघाने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवला. बीसीसीआयने एक पत्रक जाहीर करताना निवड समितीतील ५ सदस्यांना २० लाखांचे बक्षिस देण्याचे ठरवले आहे.

चेअरमन एसएमके प्रसाद, देवांग गांधी, जतिन परांजपे, गगन खोडा आणि सरनदीप सिंग यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीत समावेश आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले, ऑस्ट्रेलियात ज्याप्रकारे भारतीय संघाने प्रदर्शन केले आहे, त्यावर आम्हाला गर्व आहे. आम्ही खेळाडू आणि व्यवस्थापनाला याआधीच रोख बक्षिसाची घोषणा केली होती. आता निवड समितीला बक्षिस देत आहोत.

बीसीसीआयने याआधी अंतिम-११ च्या संघात खेळणा-या खेळाडूंना १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. याबरोबरच सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापनालाही बक्षिस दिले आहे. भारतीय संघ सध्या न्यूझीलंड येथे दौऱ्यासाठी गेला आहे. भारत न्यूझीलंड येथे ५ एकदिवसीय आणि ३ टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Leave a Comment