बीएसएफकडून 31 रोहिंग्यांचा स्वीकार, त्रिपुरा पोलिसांच्या केले हवाली

bsf
बांगलादेशाच्या सीमेवर अडकून पडलेल्या 31 रोहिंग्या मुस्लिमांना अखेर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) परत घेतले. तसेच त्या रोहिंग्यांना बीएसएफने त्रिपुरा पोलिसांच्या हवाली केले. बीएसएफ आणि बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांमध्ये या रोहिंग्यांना स्वीकारण्यावरून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र त्यात कोणताही निर्णय न झाल्याने अखेर बीएसएफने त्यांना भारतीय सीमेत प्रवेश दिला.
bsf1
हे 31 रोहिंग्या मुस्लिम 18 जानेवारीपासून भारत आणि बांगलादेशाच्यी सीमेवरील निर्मनुष्य भागात राहत होते. सीमेवर असलेल्या काटेरी तारांच्या कुंपणाबाहेर तंबूंमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. यावरून बीएसएफ आणि बॉर्डर गार्ड्स बांग्लादेश (बीजीबी) यांच्यात वादही निर्माण झाला होता. या रोहिंग्यांना आपल्या प्रदेशात ढकलण्याचा आरोप दोन्ही बाजूंनी एकमेकांवर केला होता.

“हे रोहिंग्या 18 जानेवारीपासून काटेरी तारांच्या पलीकडे होते. आम्ही हा मुद्दा बीजीबीकडे उपस्थित केला होता आणि त्यांना बांग्लादेशात परत घेण्याची विनंती केली होती. त्यांनी याला नकार दिला होता. बीजीबीसोबतच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या अनिर्णीत राहिल्या. त्यामुळे आम्ही त्यांना पोलिसांकडे सोपविले,” असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक ब्रिजेश कुमार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

बीएसएफने या चर्चेच्या अंतिम फलिताबद्दल नवी दिल्लीतील अधिकाऱ्यंना माहिती दिली आणि परिस्थितीचा अहवाल दिला. मंत्रालयाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर बीएसएफने पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील अमतोली पोलीस ठाण्यात सकाळी 11 वाजता या रोहिंग्यांना हजर केले. “वैद्यकीय तपासणीत ते सर्व ठीक असल्याचे आढळले,” असे अमतोली पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रणब सेनगुप्ता यांनी सांगितले.

Leave a Comment