मदत नव्हे चेष्टा – केरळ पूरग्रस्तांसाठीचे 3.26 कोटींचे चेक बाऊंस!

Kerala-flood-victim
केरळमधील महापुराने गेल्या वर्षी हाहाकार उडविला होता. त्यावेळी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले होते. मात्र या मदतीच्या नावावर चेष्टा झाल्याचे आता उघडकीस आले असून चक्क मुख्यमंत्री सहायता निधीतील चेक बाऊंस झाल्याचे समोर आले आहे.

कासारगोडचे आमदार एन. ए. नेलीकुन्नु यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. केरळच्या मुख्यमंत्री सहायता निधीतील (सीएमडीआरएफ) 3.26 कोटी रुपयांचे धनादेश परत आले आहेत. एकूण 3.26 कोटी रुपयांमध्ये 395 चेक आणि डिमांड ड्राफ्ट यांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी सांगितले.

केरळमधील महापुरात 350 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला होता आणि हजारो जण बेघर झाले होते. त्यावेळी सरकारी, गैर सरकारी आणि व्यक्तिगत पातळीवर अनेकांनी आर्थिक मदत केली होती.

सीएमडीआरएफमध्ये 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 2,797.67 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. यात ऑनलाईन ट्रान्सफरच्या माध्यमातून 260.45 कोटी रुपये आले आणि 2,537.22 कोटी रुपये चेक, रोख आणि डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून आले. केवळ चेकच्या स्वरूपात 7.46 कोटी रुपये आले होते, मात्र त्यातील 3.26 कोटी रुपयांचे धनादेश परत आले, असे नेलीकुन्नु यांनी न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला सांगितले.

“महापुरात लोकांच्या मृत्यूवरही काही जणांनी प्रसिद्धीचा खेळ केला, असे बाऊंस झालेल्या धनादेशांवरून दिसते,” असे ते म्हणाले.

Leave a Comment