व्हाट्सअॅपची ‘फॉरवर्ड मर्यादा’ आता जगभरात लागू

whatsapp
खोट्या बातम्या आणि अफवांचा प्रसार रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने गेल्या वर्षी कोणताही मेसेज एका वेळेस पाच जणांनाच पुढे पाठविण्याची मर्यादा लागू केली होती. भारतापुरती असलेली ही मर्यादा आता व्हाट्सअॅपने जागतिक पातळीवर लागू केली आहे.

सोमवारी व्हाट्सअॅपने आपल्या ब्लॉगवर ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये व्हाट्सअॅपने भारतात हे निर्बंध लागू केले होते. हे निर्बंध आता जगभरासाठी लागू करतानाच यामुळे व्हाट्सअॅप आपल्या जवळच्या संपर्काना खाजगी संदेश पाठविण्यावर केंद्रीत राहील, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

“व्हाट्सअॅपने या चाचणीचे लक्षपूर्वक मूल्यांकन केले आणि सहा महिन्यांच्या कालावधीत वापरकर्त्यांच्या अभिप्रायांकडे लक्ष दिले. फॉरवर्डवरील मर्यादेमुळे जगभरात फॉरवर्ड संदेशांचे प्रमाण कमी झाले,” असे कंपनीने म्हटले आहे. या चाचणीच्या कालावधीत व्हाट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या संदेशांमध्ये 25 टक्के घट झाल्याचे दिसून आले, असे कंपनीच्या प्रवक्त्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

“आजपासूनच, व्हाट्सअॅपच्या नवीनतम आवृत्त्यांवरील सर्व वापरकर्त्यांना आता एका वेळी फक्त पाच जणांना मेसेज फॉरवर्ड करता येतील,” असे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. यापूर्वी व्हाट्सअॅप वापरकर्ते 20 जणांना संदेश पाठवू शकत असत.

व्हाट्सअॅप या मेसेंजर प्लॅटफॉर्मचे जगभरात जवळजवळ 1.5 अब्ज वापरकर्ते आहेत. भारतासोबतच ब्राझिल आणि इंडोनेशिया हे व्हाट्सअॅपचे प्रमुख बाजारपेठ देश आहेत.

Leave a Comment