व्यापार युद्ध पडले चीनला महागात, 28 वर्षांनंतर सर्वात मोठा फटका

china
अमेरिकेशी सुरू असलेले व्यापार युद्ध आता चीनला महागात पडत असून गेल्या 28 वर्षांमध्ये चीनला सर्वात मोठा फटका बसला आहे. चीनच्या आर्थिक विकासाचा दर 6.6 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. अमेरिकेशी चालू असलेले व्यापार युद्ध आणि निर्यातीत झालेली घट यामुळे आर्थिक वर्ष 2018 मध्ये चीनला नुकसान झाले असल्याचे मानले जात आहे.

डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत चीनच्या आर्थिक वाढीचा दर 6.4 टक्के एवढा राहिला. त्यापूर्वीच्या तिमाहीत हा दर 6.5 टक्के होता. संपूर्ण 2018 या वर्षात आर्थिक वाढीचा दर 6.6 टक्के एवढा होता, असे चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनबीएस) म्हटले आहे.

वर्ष 2017 मध्ये चीनचा आर्थिक वाढीचा दर 6.8 टक्के होता. चीनचा हा दर 1990 नंतरचा सर्वात कमी दर आहे. त्यावेळी चीनच्या आर्थिक वाढीचा दर 3.9 टक्के होता. मागील एक वर्षापासून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या आयातित वस्तूंवर शुल्क लावले आहे.

दुसरीकडे आर्थिक विकास दराच्या बाबतीत भारताने आघाडी घेतली आहे. येत्या दोन वर्षांत चीनच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था एक टक्का अधिक वेगाने वाढेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. तसेच भारत हा 2018-19 मध्ये जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

Leave a Comment