बीसीसीआय संघातील खेळाडूंना बनवणार संस्कारी

BCCI
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांना कॉफी विथ करण’ या टेलिव्हिजन कार्यक्रमात महिलांविषयी टीप्पणी करणे चांगलेच महागात पडल्याचे स्पष्ट होत आहे. या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयने घातलेल्या बंदीनंतर आता आणखी एक दणका बसला आहे. संपूर्ण क्रिकेट संघालाच या दोघांमुळे आता शिस्त आणि वर्तणूकीचे धडे देण्यात येणार आहे.

संपूर्ण भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंना विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या The Committee of Administrators (CoA) यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एका समुपदेशन सत्रात वर्तणूकीचे धडे देण्यात येणार आहेत.

नॅशनल क्रिकेट अकॅडमी येथे संघातील वरिष्ठ खेळाडू आणि १९ वर्षांखालील क्रिकेट संघातील नवोदित खेळाडूंचा सहभाग असणारे हे सत्र पार पडणार आहे. ज्यामध्ये एक खेळाडू म्हणून वागण्यामध्ये आवश्यक असणाऱ्या निकषांची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. लैंगिक संवेदनशीलतेसारख्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही यामध्ये समुपदेशन करण्यात येणार आहे, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती गोपनीयतेच्या अटीअंतर्गत एका वृत्तसंस्थेला दिली.

कोणत्या वेगळ्या सत्रांचे आयोजन राहुल आणि पांड्या यांच्यासाठी करण्यात आले आहे का, असे विचारले असता, अधिकाऱ्यांनी नकारार्थी उत्तर दिले. युवा खेळाडूंसाठी लैंगिक संवेदनशीलतेविषयीच्या समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात यावे, असा पर्याय बीसीसीयाचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी सुचवला होता. जेणेकरुन भविष्यात अशी परिस्थिती उदभवल्यास त्यांना याचा नीट सामना करता येईल.

Leave a Comment