नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला हव्या आहेत लोकसभेच्या ५ जागा

narayan-rane
मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपच्या हायकमांडने राष्ट्रीय जाहीरनामा समितीत स्थान दिल्यानंतरही राणे यांचे समाधान झाले नाही. त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला महाराष्ट्रात लोकसभेच्या ५ जागा त्यांनी मागितल्या असल्याचे वृत्त आहे.

सोमवारी रात्री उशिरा राणे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. पण, याला अधिकृत पुष्टी मिळाली नाही. भाजपच्या तिकिटावर खासदार झालेले राणे भाजपत नाराज असून ते लवकरच काँग्रेस पक्षात परत येतील असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. राणे यांचा या पार्श्वभूमीवर भाजपवर अधिक दबाव वाढवून जागा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

तसेच राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिवसेनेकडे असलेली रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा नीलेश राणे यांच्यासाठी स्वाभिमान पक्षासाठी सोडण्याची मागणी ही केली असल्याचे सांगितले जात आहे. मागणी केलेल्या ५ जागांपैकी एक मुंबईत असावी, असा आग्रही राणे यांनी केला आहे. या मागण्यांच्या वाटाघाटी न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार, असा इशारा ही राणे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या भेटीबाबत मुख्यमंत्री फडणवीस अथवा राणे यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही.

Leave a Comment