भारत 2019 -20 मध्ये जागतिक विकासाचा नेता असेल: आयएमएफ

IMF
जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण असले तरी 2019-20 या आर्थिक वर्षात भारत हा जागतिक विकासाचा नेता असेल आणि भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) म्हटले आहे.

आयएएफच्या मुख्य अर्थशास्त्री गीता गोपीनाथ यांनी सोमवारी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक अपडेट’ हा अर्थव्यवस्थेचा अंदाज व्यक्त करणारा अहवाल जाहीर केला. “जागतिक विस्तार कमजोर होत आहे आणि त्याचा वेग अपेक्षेपेक्षा किंचित जास्त आहे,” असे यावेळी गोपीनाथ म्हणाल्या.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, असे अहवालात म्हटले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे गोपीनाथ यांनी हा अहवाल प्रकाशित केला. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर 7.3 टक्के होता आणि 2020-21 मध्ये ही वाढ 7.7 टक्के असणे अपेक्षित आहे, असे आयएमएफच्या प्रमुख अहवालात म्हटले असल्याचे आयएएनएस वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

“महागाईचा दबाव कमी होत असल्याने आणि तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था 201 9 मध्ये वेगाने वाढण्यास सज्ज आहे” असे अहवालात म्हटले आहे.

वर्ष 2019 मध्ये जागतिक विकास दर 3.5 टक्क्यांवर राहील, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये जारी केलेल्या अहवालातील अंदाजापेक्षा तो 0.2 टक्क्यांनी कमी आहे.

गोपीनाथ या केरळ सरकारच्या माजी सल्लागार असून त्यांनी आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून सूत्रे हाती घेतली. हे महत्त्वाचे पद धारण करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

Leave a Comment