सहकाऱ्याला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदाराची हकालपट्टी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

congress
कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंगाने सोमवारी वेगळेच वळण घेतले. बंगळूरुतील एका रिसॉर्टमध्ये थांबलेल्या काँग्रेस आमदारांमध्ये मारहाण झाली. ही मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदाराची हकालपट्टी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, तर त्याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

शनिवारी रात्री या दोन आमदारांमध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणी जे. एन. गणेश यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. आनंद सिंग असे या प्रकरणात जखमी झालेल्या आमदाराचे नाव आहे.

आनंद सिंग यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आनंद सिंग यांचा डोळा काळा पडला असून त्यांना मुका मार लागला आहे, असे सूत्रांनी सांगितल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाकडून आमिष दाखविण्याच्या शंकेने काँग्रेसच्या सर्व आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. सिंग आणि गणेश हे दोघेही बेळ्ळारी जिल्ह्यातील आमदार आहेत.शनिवारी रात्री त्यांच्यात तीव्र वाद झाला. यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली. यानंतर सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, खुनाच्या प्रयत्नाबरोबरच गंभीर जखमा करणे आणि धमकी देण्याचा आरोप गणेश यांच्यावर आहे.

गणेश यांना ताबडतोब पक्षातून निलंबित करण्याचा आदेश कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी दिले आहेत. तसेच या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री जी परमेशश्वर यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ता. 19 जानेवारी रोजी घडलेल्या ‘अप्रिय’ घटनेबद्दल पक्षाच्या नेत्यांनी प्राथमिक चौकशी केली असून आनंद सिंग यांच्याकडून माहिती घेतली आहे, असे पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment