धोनी, कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यात विक्रमाची संधी

combo
मुंबई – भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील कसोटी व एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला असून शनिवारी ऑकलंडमध्ये भारतीय संघ दाखल झाला. उद्यापासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिकेस सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहलीला या दौ-यात विक्रमाची संधी आहे.

आता न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अर्धशतकांची हॅट्ट्रिक करणाऱ्या धोनीचे लक्ष्य असेल. धोनी न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत १० वनडेत धोनीने ४५६ धावा केल्या आहेत. तर, यामध्ये सचिन तेंडुलकर १८ सामन्यात ६५२ धावा काढून पहिल्या स्थानावर आहे तर भारताचा माजी विस्फोटक सलामीवर वीरेंद्र सेहवाग १२ सामन्यात ५९८ धावा काढून दुसऱ्या स्थानावर आहे. सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला १४३ तर, सचिनचा विक्रम मोडण्यासाठी १९७ धावांची गरज आहे. धोनीला या मालिकेत ५ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. धोनीचा सध्याचा फॉर्म पाहता हे दोन्ही विक्रम तो सहज मोडण्याची शक्यता आहे.

तर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी कर्णधार विराट कोहलीकडे चालून आली आहे. वनडेत लाराने २८९ डावात १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. आपल्या करीअरमध्ये लाराने २९९ डावात ४०.४८ च्या सरासरीने १० हजार ४०५ धावा केल्या आहेत. यामध्ये लाराच्या नावावर १९ अर्धशतक आणि ६३ अर्धशतक आहेत. तर कोहलीने २१९ डावात ५९.६८ च्या सरासरीने १० हजार ३८५ धावा केल्या आहेत. यामध्ये कोहलीच्या नावावर सध्या ३९ शतके आहेत. कोहलीला लाराचा विक्रम मोडण्यासाठी केवळ २० धावांची गरज आहे.

सचिनने एकदिवसीय सामन्यात ४६३ सामन्यात १८ हजार ४२६ धावा काढल्या आहेत. त्यामध्ये ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. एकुण धावांमध्ये श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक कर्णधार कुमार संगकारा १४ हजार २३४ धावा काढून दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडून रिकी पाँटिंग १३ हजार ७०४ धावा काढून तिसऱ्या स्थानावर आहे. तर लंकेचाच सनथ जयसुर्या हा १३ हजार ४३० धावासह चौथ्या स्थानावर आहे. महेला जयवर्धने हा १२ हजार ६५० धावा काढून टॉप फाईव्हमध्ये आहे.

Leave a Comment