अमेरिकेच्या सिनेटरपदी भारतीय वंशाच्या मोना दास

mona-das
नवी दिल्ली – अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ४७व्या जिल्ह्याच्या सिनेटर म्हणून भारतीय वंशाच्या मोना दास निवडून आल्या आहेत. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आहे. त्यांना हे यश प्रथम प्रयत्नातच मिळाले आहे. त्यांचे आपल्या जन्मस्थळी येऊन तेथील महिलांना शिक्षित करण्याचे ध्येय आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारीला डेमोक्रेटीक पक्षाच्या सदस्य मोना दास यांनी सिनेट पदाची शपथ घेतली. २ वेळा सिनेटर असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य फैन यांना त्यांनी पराभूत केले आहे. त्या सिनेटमध्ये हाऊसिंग स्टेबिलिटी अँड अफोर्डेबिलिटी कमिटीच्या उपाध्यक्ष पदावर काम करणार आहेत.

त्यांचे आपल्या वडिलांच्या गावी म्हणजेच बिहार येथे जाऊन तेथील मुलींना शिक्षित करण्याचे स्वप्न आहे. सिनसिनाटी विद्यापीठातून मनोविज्ञान विषयात दास यांनी पदवी संपादन केली आहे. कुटुंबातील एक महिला शिक्षित झाली तर ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करण्याचे सामर्थ्य ठेवते, असे मोना यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे. त्यांचा जन्म १९७१ मध्ये बिहारच्या दरभंगा येथील एका रुग्णालयात झाला. आठ महिन्याची असतानाच त्यांच्या पालकांसोबत त्या अमेरिकेला गेल्या होत्या.

Leave a Comment