रोहिंग्यांना घेण्यास बांगलादेशचा नकार, सीमेवर 31 जण अधांतरी

rohingya
भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी आत घेण्यास नकार दिल्यामुळे 31 रोहिंग्या मुस्लिम तीन दिवसांपासून सीमेवर अधांतरी अडकले आहेत. या रोहिंग्यांमध्ये 17 बालकांचा समावेश आहे, असे बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

भारताने 2018 मध्ये 230 रोहिंग्यांना अटक केली होती. भारतातून म्यानमारला निर्वासित करण्याच्या भीतीने अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये 1,300 पेक्षा अधिक रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात प्रवेश केला आहे. यातील सर्वात अलीकडील गटाने सीमेवरील भारतीय बाजूकडचे काटेरी तारेचे कुंपण ओलांडले, मात्र बांगलादेशच्या सीमा रक्षकांनी त्यांना त्यांच्या हद्दीत येण्यापासून रोखले.

“आता ते सीमेवरील निर्मनुष्य प्रदेशात भारतीय सीमा सुरक्षा दलाने पुरवलेल्या दोन तंबूत राहत आहेत,” असे बांगलादेशी सीमेवरील कस्बा या गावातील स्थानिक सरकारी अधिकारी मन्नन जहांगीर यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

हा जथ्था जम्मू-काश्मीरमधून 18 जानेवारी रोजी सीमेवर पोहोचला, असे बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाचे कमांडर लेफ्टनंट कर्नल गोलम कबीर यांनी सांगितले.

दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी एक बैठक आयोजित केली होती. या शरणार्थ्यांकडे भारतीय आरोग्य कार्डे आणि राष्ट्रसंघाच्या निर्वासित संस्थेने दिलेली कागदपत्रे असल्यामुळे त्यांना भारताने स्वीकारावे, असा आग्रह यावेळी बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांनी धरला होता.

Leave a Comment