लोकसभा निवडणूक लढवणार करिना कपूर?

kareena-kapoor
तीन राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेस लोकसभा निवडणुकीतही फायदा उचलण्याचा प्रयत्न असून पक्षाकडून यासाठी जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनी भोपाळच्या लोकसभा जागेवर विजयाचा फॉर्म्युला शोधला आहे. कोणा राजकारण्याला उमेदवारी न देता बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानला भोपाळमधून उमेदवारी द्यावी असे त्यांचे म्हणणे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे भोपाळच्या जागेवर निर्विवाद वर्चस्व असल्यामुळे करिना कपूरला जर उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला हादरा बसू शकतो. याशिवाय, पतौडी कुटुंबाची करिना कपूर ही सून झाली असून परिणामी काँग्रेसला जुन्या भोपाळमध्ये तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल, असे काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील नेते गुडडू चौहान आणि अनीस खान यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी लवकरच हे नेते मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटही घेणार असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून पतौडी कुटुंब भोपाळमध्ये स्थायिक आहे. अनेकदा भोपाळला सैफ, करिना, शर्मिला टागोर आणि सोहा अली खान जाऊन देखील गेले आहेत. पण १९९१ मध्ये मंसुर अली खान पतौडी यांनी भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांना त्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, आता काँग्रेसच्या तिकीटावर करिना लोकसभा निवडणूक लढवणार का आणि आपल्या नेत्यांच्या मागणीला काँग्रेस पक्ष कसा प्रतिसाद देतो हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment