निवडणूक चिन्ह असल्यामुळे कप-बशीतून चहाला मनाई !

t
हरियाणातील जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) संयोजक आणि हिसारचे खासदार दुष्यंत चौटाला यांनी आपला जुना पक्ष इंडियन नॅशनल लोकदलावर (इनेलो) हल्ला चढविला आहे. कप-बशी हे आमचे चिन्ह असल्यामुळे इनेलोने आपल्या कार्यकर्त्यांना कप-बशीतून चहा पिऊ दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.

“इनेलोच्या कार्यकर्त्यांना कप-बशीतून चहा पिण्यास मनाई करण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे कप-बशी हे जेजेपीचे उमेदवार दिग्विजय चौटाला यांचे चिन्ह आहे. इनेलो कार्यकर्त्यांना ग्लासमध्ये चहा पिण्यास भाग पाडले जात आहे. ते एवढे घाबरले आहेत, की आमच्याबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत,” असे दुष्यंत जींद येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले. माजी मंत्री परमानंद यांचे चिरंजीव धरमपाल तंवर यांचे पक्षात स्वागत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आमचा मुकाबला केवळ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी आहे, असे दुष्यंत यांनी सांगितले. दुष्यंत हे इनेलोचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला यांचे नातू आहेत. त्यांच्यासोबत दिग्विजयसिंग यांचेही पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेण्यात आले होते. त्यानंतर दुष्यंत यांनी स्वतःचा पक्ष काढला होता.

Leave a Comment