भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत 2018 मध्ये दर दिवशी 2200 कोटींनी वाढ – ऑक्सफॅम

rs
भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 2018 या वर्षात दर दिवशी 2200 कोटींनी वाढली. देशातील सर्वात श्रीमंत एक टक्के व्यक्ती 39 टक्क्यांनी अधिक श्रीमंत झाल्या तर खालच्या थरातील लोकांच्या संपत्तीत केवळ 3 टक्के वाढ झाली, असे ऑक्सफॅम या संस्थेने सोमवारी सांगितले.

जागतिक पातळीवर अब्जाधीशांची संपत्ती 2018 मध्ये 12 टक्के किंवा 2.5 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे, तर तर जगातील गरिबांची संपत्ती 11 टक्क्यांनी घटली आहे, असे संस्थेने म्हटले आहे. जागतिक आर्थिक मंचाची (डब्ल्यूईएफ) पाच दिवसीय वार्षिक बैठक स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे सुरू होत आहे. त्यानिमित्त संस्थेच्या वतीने हा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे.

भारतात13.6 लोक सर्वाधिक गरीब असून त्यांचे लोकसंख्येतील प्रमाण 10 टक्के आहे. हे लोक 2004 पासून अद्याप कर्जात आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

वाढत्या श्रीमंत-गरीब विभाजनाबाबत त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी ऑक्सफॅमने दावोसमध्ये जमलेल्या राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांकडे केली आहे. गरीब-श्रीमंतांतील ही वाढती असमानता दारिद्र्यविरोधी लढ्याला नुकसान पोचवत आहे, अर्थव्यवस्थेला हानी पोचवत आहे आणि जगभरातील जनतेमध्ये रोष निर्माण करत आहे, असे संस्थेने म्हटले आहे.

ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या कार्यकारी संचालक विनी बायनीमा डब्ल्यूईएफमधील महत्त्वाच्या सहभागींपैकी एक आहेत. भारताच्या संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा काही श्रीमंत व्यक्तींकडे एकवटत आहे तर गरीब आपल्या जेवणासाठी किंवा मुलांच्या औषधांचे पैसे देण्यासाठी झगडत आहेत. हे नैतिकदृष्ट्या उद्वेगकारक आहे, असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment