तुर्कीतील महिला खाऊ शकत नाही अशा प्रकारे आईस्क्रिम

icecreame
अंकारा – तुर्कीतील सर्वात मोठे शहर असलेल्या इस्तांबुलच्या स्थानिक प्रशासनाने नवा फतवा जारी केला आहे. त्या फतव्यानुसार, नैतिकतेचे धडे देणारा एक अभ्यासक्रम येथील महिलांना पूर्ण करावा लागणार आहे. यात काही निती निर्देश सुद्धा जारी करण्यात आले. त्यानुसार, आता सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही महिलेला आईस्क्रिम खाता येणार नाही. ते खाताना त्यांना चाटता तर मुळीच येणार नाही. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी आईस्क्रिम खाणे आक्षेपार्ह असल्याचे यात सांगण्यात आले आहे. पण या नियमाला सोशल मीडियावर तीव्र विरोध सुरू झाला आहे. महिलांच्या स्वातंत्र्यावर हे नियम हल्ला करणारे असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

महिलांना नैतिकता आणि सद्वर्तनाचे धडे देण्यासाठी इस्तांबुलच्या महापालिकेने 2 महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. तरुणींनी आणि महिलांनी या कोर्समध्ये सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे सांगितले जाणार आहे. प्रशासनाच्या मते, सार्वजनिक ठिकाणी इस्तांबुलच्या सभ्य महिलांना आपले आचरण योग्य ठेवावे लागेल. नेहमीच महिलांनी नम्र राहावे आणि घरकाम कसे करावे हे अभ्यासक्रमात लेक्चरच्या माध्यमातून शिकवले जाणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी महिलांनी पूर्ण तोंड उघडून बोलू नये आणि सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासात महिलांनी जास्त वेळ गप्पा-गोष्टी करू नये असे सुद्धा सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर स्थानिक प्रशासनाच्या या अजब नियमांवरून संताप उमटला आहे. याबाबत ‘लेडीज गाइड’ नावाच्या एका समूहाने सांगितले, की या लोकांनी (महापालिका) हे तर सांगितले की महिलांनी सार्वजनिक ठिकाणी आईस्क्रिम खाऊ नये. परंतु, महिलांनी आईस्क्रिम कोन का खाऊ नये? त्याने असे काय होईल? याबाबत काहीच म्हटलेले नाही. काहींनी तर लोक महिला आईस्क्रिम कशा पद्धतीने खातात यावर सुद्धा लक्ष ठेवतात या गोष्टीवर विश्वास बसत नाही असे म्हटले आहे. तर काहींनी आता प्रशासनाने सांगावे की आईस्क्रिम खाण्याची पद्धत नेमकी कशी आहे. आईस्क्रिम चाटू नये तर मग काय अख्खे कोन एका घासात तोंडात टाकावे का? असा सवाल लोकांनी उपस्थित केला.

Leave a Comment