एकदिवसीयमध्ये आजही धोनीच सर्वोत्तम फिनीशर – इयान चॅपल

mahendra-singh-dhoni
मेलबर्न – भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. धोनीने कांगारुंविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यात 3 अर्धशतके झळकावत मालिकावीराचा किताब पटकावला. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपल त्याच्या या खेळीवर बेहद्द खुश असून इयान चॅपल यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजुनही धोनीच सर्वोत्तम फिनीशर असल्याचे म्हटले आहे.

आजही धोनीकडे सामना जिंकवून देण्याची कला अवगत आहे आणि यामध्ये कोणीही त्याला मात देऊ शकत नाही. धोनी सामन्यात गरजेनुसार आपली खेळी उभी करतो, म्हणजे अजुनही क्रिकेटचे विचार त्याच्या डोक्यात सुरु आहेत. ऑस्ट्रेलियाकडून काही वर्षांपूर्वी मायकल बेव्हन अशाच प्रकारे आपल्या संघाला सामने जिंकवून द्यायचा. आजही धोनी भारतासाठी ते काम करत आहे. चॅपल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फो या संकेतस्थळासाठी लिहीलेल्या लेखात धोनीचे कौतुक केले आहे.

धोनी आजही धावा काढताना ज्या पद्धतीने पळतो ते थक्क करुन सोडणारे आहे. माझ्यामते धोनी आणि बेवन यांच्यात तुलना करायची झाल्यास मी धोनीला अधिक पसंती देईन. अनेकांची यावर वेगळी मते असू शकतात, पण धोनी माझ्यासाठी अजुनही एकदिवसीय क्रिकेटचा सर्वोत्तम फिनीशर आहे.

Leave a Comment