काँग्रेस ही चोर होतीच, पण राफेल घोटाळ्यातून भाजपही महाचोर असल्याचे झाले स्पष्ट

prakash-ambedkar
अमरावती – सायन्सकोर मैदान येथे हजारोच्या संख्येत जमलेल्या गर्दीला संबोधित करताना भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा काँग्रेसने केला नसता तर भाजप सत्तेवर येऊ शकली नसती. काँग्रेस ही चोर होतीच, पण भाजपही महाचोर असल्याचे राफेल घोटाळ्यातून स्पष्ट झाले, असा आरोप केला.

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, व्यवस्थेचे राज्य मोडण्याचा डाव संस्कृतीचे ठेकेदार म्हणवणाऱ्या भाजप आणि आरएसएसने आखला आहे. तीन तलाखांच्या विरोधाची बंदूक मुस्लिमांच्या खांद्यावर ठेऊन हिंदूंवर यांचा डोळा आहे. भाजपचे भविष्यात हिंदूंच्या घरातही अस्वस्थता निर्माण करण्याचे धोरण आहे. भाजप आणि आरएसएसचा उपभोग घेणारी नवी पेशवाई आणण्याचा डाव आहे. नागपुरात होणार मेट्रो ही विदर्भाचे मोठे नुकसान आहे. विदर्भ भविष्यात स्वतंत्र राज्य झाले की, या मैत्रीचा बोजा आपल्यावर येईल. ही मेट्री रेल्वे विदर्भाला तोट्यात नेणारी असून नितीन गडकरी हे यासाठी जबाबदार आहेत.

शरद पवार यांनी विदर्भातील संत्र्यामध्ये अॅसिड आहे, असा गैरसमज पसरवून येथील संत्रा उद्योग संपवला. अमरावतीचा खासदार साताऱ्याचा आहे. शरद पवारांनी त्याला इकडे पाठवले असून जागे व्हा, असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. संत्रा प्रक्रिया उद्योग येथे सुरू झाला तर शेतकऱ्यांचा कायापालट होईल. यासाठी येथे चांगला खासदार हवा आहे. पावर प्लांट मधून पैसे खाणारा खासदार नको आहे. येथे बँकांचे प्रमुख एकमेकांच्या नात्यातील आहे. सत्ता धनगर, माळी, वंजाऱ्यांच्या हातात गेली तरच राज्याचा विकास होईल. आम्ही सत्तेत आलो तर बलुतेदारांना कमी दरात कर्ज देऊ. सर्वांच्या विकासाला प्राधान्य देऊ असेही आंबेडकर म्हणाले.

भाजप आणि काँग्रेसचा सत्तेसाठी कुटील डाव सुरू आहे. लोकांचा निधी विधायक कामासाठी लागला पाहिजे. सत्ता संपादनासाठी मतभेदाची, दंगलीची कीड आपल्याला संपवायची आहे. घराणेशाही मोडीत काढल्याशिवाय सर्वसामान्यांची सत्ता येणार नाही. काँग्रेसवाले २००४ साली न्यूक्लियर डीलवेळी डावे दुरावल्यावर एमआयएमकडे गेले होते. काँग्रेससारखी बदमाश पार्टी कोणतीही नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमचे अमरावती लोकसभा मतदार संघातून गुणवंत देवपारे हे उमेदवार असतील असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा अमरावती दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने ते या सभेला उपस्थित राहु शकले नाही. मुंबई येथील एमआयएमचे आमदार वारीस खान पठाण, भारिप बहुजन आघाडी आणि एमआयएमचे स्थानिक पदाधिकारी तसेच नेते सभेला मंचावर उपस्थित होते.

Leave a Comment