आपच्या नेत्याची दारू सोडण्याची शपथ, केजरीवाल यांच्याकडून कौतुक

Bhagwant-Mann
पंजाबमधील आम आदमी पक्षाचे वादग्रस्त नेते भगवंत मान यांनी दारू सोडण्याची शपथ घेतली आहे. त्यांच्या या घोषणेचे पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले असून त्यांनी माझे मन जिंकले आहे, असे म्हटले आहे.

संगरूरचे खासदार असलेले भगवंत मान यांनी रविवारी सांगितले की 1 जानेवारीपासून आपण दारू सोडली आहे. आपल्या आईच्या सल्ल्यावरून दारू पिणे सोडले आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

मान यांच्या “अति दारू पिण्याबद्दल” ते नेहमीच राजकीय विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयाचे दिल्लीचे मुख्यमंत्री व आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कौतुक केले आहे.

“माझे राजकीय विरोधक नेहमी माझ्याविरुद्ध आरोप करतात, की भगवंत मान दारू पितात आणि रात्रंदिवस नशेत असतात. सोशल मिडियावर माझी बदनामी करणारे जुने व्हिडीओ पाहिल्यावर मला नेहमी दुःख होते,” असे ते एका सभेत बोलताना म्हणाले.

आपण 1 जानेवारीपासून दारू सोडली असून आयुष्यभरासाठी दारू सोडण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
त्यानंतर आपल्या भाषणात केजरीवाल यांनी मान यांचे कौतुक केले. “ही छोटी गोष्ट नाही,” असे ते म्हणाले.

“भगवंत मान यांनी माझे हृदय जिंकले आहे. फक्त माझेच नाही, त्यांनी संपूर्ण पंजाबचे मन जिंकले आहे. लोकांसाठी कोणताही त्याग करण्यासाठी तयार असणारा त्यांच्यासारखा नेता असायला हवा,” असे केजरीवाल म्हणाले.

Leave a Comment