शत्रुघ्न सिन्हा संधीसाधू, त्यांना जाब विचारणार : भाजप

shatrughan-sinha
भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधी पक्षातील उपस्थितीबाबत त्यांना जाब विचारण्यात येईल, असे पक्षाने म्हटले आहे. तसेच सिन्हा हे संधीसाधू असल्याची संभावनाही भाजपने केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकाता येथे नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या सभेचे आयोजन केले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि पाटण्याचे खासदार असलेल्या सिन्हा यांनी झालेल्या सभेत भाग घेतला होता. यावेळी त्यांनी मोदी आणि केंद्रातील सरकारवर टीकाही केली होती.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना सिन्हा यांचे वर्णन संधीसाधू असे केले. खासदार म्हणून असलेल्या सगळ्या सोईसुविधांसाठी ते अजूनही पक्षात आहेत, मात्र वेगवेगळ्या व्यासपीठावर ते वेगवेगळी मते मांडत आहेत, असे रूडी म्हणाले.

‘‘सिन्हा हे वेगवेगळ्या व्यासपीठांवर पक्षाच्या विरोधात बोलत आहेत. भाजपने अशा लोकांवर कारवाई करावी, हे महत्त्वाचे आहे आणि पक्ष याची दखल अवश्य घेईल,’’ असे रूडी म्हणाले.

काही जण वेगळ्याच प्रकारे बुद्धिमान असतात. ते पक्षादेशाचे पालन करतात जेणेकरून त्यांची खासदारकी जाऊ नये आणि त्याच वेळेस ते कुठल्याही संमेलनात भाग घेतात, असे ते म्हणाले.

Leave a Comment