पाकिस्तानातील इस्लामी संस्थेचा हुबळीत ‘इज्तेमा’ – काँग्रेस आमदारावर सहभागाचा आरोप

congress1
कर्नाटकातील हुबळी येथे शनिवारी आणि रविवारी इज्तेमा कार्यक्रम करण्याची घोषणा पाकिस्तानातील एका इस्लामी संस्थेने केली आहे. त्यामुळे नवीन वाद उद्भवला असून या कार्यक्रमाला काँग्रेस आमदाराची मदत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक इस्लामी गटांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला आहे.

दावत-ए-इस्लामी असे या संघटनेचे नाव आहे. या कार्यक्रमाला सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या असल्याचा दावा संस्थेचा दावा आहे. गंमत म्हणजे या संघटनेच्या कार्यक्रमांवर पाकिस्तानातही बंदी घालण्यात आली आहे, असे टाईम्स नाऊ वाहिनीने म्हटले आहे.

काँग्रेसचे आमदार प्रसाद अब्बय्या हे काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाच्या आयोजकांना भेटले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला त्यांचा पाठिंबा दर्शविला आहे, असा दावा वाहिनीने केला आहे. अनेक मुस्लिम संघटनांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र काँग्रेसचे नेते एम. बी. पाटील यांनी या विषयावर टिप्पणी करण्यास नकार दिला.

तेलंगाणा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर संस्थेने अब्बय्या यांच्याशी संपर्क साधला होता. कर्नाटक निवडणुकीच्या काळात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या कट्टरवादी संघटनेची मदत मागितल्याबद्दल यापूर्वी अब्बाया हे वादात सापडले होते.

या प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ताकीद द्यावी, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment