माजी केंद्रीय मंत्री श्रीकांत जेनांची काँग्रेसमधून हकालपट्टी

congress
माजी केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आमदार कृष्णाचंद्र सागरिया यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

श्रीकांत जेना यांनी ओडिशा प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ओडिशा काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे संयोजक अनंत प्रसाद सेठी यांनी रात्री उशिरा ही कारवाई केली.

जेना आणि सागरिया यांनी माध्यमांसमोर पक्षविरोधी वक्तव्ये केली. त्यामुळे काँग्रेसला नुकसान झाले. म्हणून या दोघांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, असे सेठी यांनी निवेदनात म्हटले आहे.

जेना यांनी ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीच्या (ओपीसीसी) पदाधिकाऱ्यांविरुद्धही टिप्पणी केली होती, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसने सुंदरगढचे आमदार जोगेश सिंह यांना पक्षातून काढले होते.

जेना हे मागील यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. बालासोर मतदारसंघातून 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते.सागरिया हे कोरापुट मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. सागरिया यांनी ओपीसीसीचे अध्यक्ष निरंजन पटनायक यांच्यावर टीका केली होती. काँग्रेस ही निरंजन पटनायक यांची खासगी मालमत्ता नाही, असे ते म्हणाले होते.

Leave a Comment