काँग्रेस आमदाराने दिली सिद्धरामय्यांना 1.8 कोटींची मर्सिडीज?

Siddaramaiah
कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस युती सरकार संकटात असतानाच माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या बाबत नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांना भेटीदाखल मिळालेल्या 1.8 कोटी रुपयांच्या मर्सिडीज एसयूव्हीवरून हा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील एका काँग्रेस आमदाराने ही महागडी कार त्यांना भेट दिली असल्याची चर्चा आहे.

सिद्धरामय्या यांना ही मर्सिडीज कार काँग्रेस नेते सुरेश बी. यांनी भेट दिल्याचे बंगलोर मिरर या वृत्तपत्राने म्हटले आहे. सुरेश बी. हे राज्यातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळीस त्यांनी देलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती 416 कोटी रुपये आहे. मात्र आपण ही कार सिद्धरामय्यांना भेट दिल्याचे त्यांनी नाकारले आहे. ही एसयूव्ही माझी आहे आणि मी ती सिद्धरामय्या यांच्या घरासमोर पार्किंगमध्ये उभी केली होती, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

मे 2018 मध्ये सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद सोडले होते तेव्हा उद्योगमंत्री के. जे. जॉर्ज यांनी त्यांना लँडक्रूझर गाडी भेट दिली होती. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना महागड्या हूब्लो घडाळ्यामुळे वादात सापडले होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री डी. के. शिवकुमार यांनीही ही कार भेट दिल्याचे नाकारले आहे. ही भेट दिल्याचा कुठेही उल्लेख नाही, असे ते म्हणाले.

Leave a Comment