नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात कंबर कसली आहे. आयोगाने फेक न्यूज पसरवणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकांचे चुकीचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पसरवणाऱ्याविरोधात आयोगाने कारवाईही केली होती.
निवडणूक आयोगाने फेक न्यूजविरोधात कसली कंबर
फारच कमी कालावधी लोकसभा निवडणूकांना उरला असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यातच सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे चुकीचे वेळापत्रक फिरत होते. या प्रकारामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
लोकसभेचे जे खोटे वेळापत्रक सोशल मीडियावर फिरत होते, त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात आयोगाने गुन्हा ही नोंदवला आहे. कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेले नाही. निवडणुकांशी संबंधित चुकीची बातमी पसरवल्यास त्याविरोधात होणाऱ्या कारवाईची माहिती आयोगाला देण्यात येणार आहे. म्हणजेच दोषिंच्या विरोधात आयोगच प्रत्यक्ष कारवाई करणार आहे.