मानवाधिकारांचे उल्लंघन – चीनच्या विरोधातील विधेयके अमेरिकेच्या संसदेत सादर

Bills-Holding-China
वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्यकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकी संसदेच्या सभागृहांत गुरुवारी विधेयके सादर करण्यात आली. विशेष म्हणजे रिपब्लिक आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांच्या प्रमुख संसद सदस्यांनी ही विधेयके सादर केली.

अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्हज् या दोन्ही सभागृहांत ही विधेयके सादर करण्यात आली. झिनजियांग उईगुर स्वायत्त क्षेत्रात चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची हाताळणी करण्यासाठी अमेरिकी सरकारला नवे अधिकार देण्याची तरतूद या विधेयकांत आहे.

या क्षेत्रातील 10 लाखांहून अधिक उईगुर आणि इतर तुर्की मुस्लिम अल्पसंख्यकांना “राजकीय शिक्षण” शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच चीनमध्ये मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या उईगुर व्यक्तींची कुटुंबेच्या कुटुंबे नाहीसे झाली आहेत. त्यात अनेक अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे, असे संसद सदस्यांनी म्हटले आहे.

सिनेटमध्ये मार्को रुबीओ आणि बॉब मेनेंडेझ आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्हज् सभागृहात ख्रिस स्मिथ आणि थॉमस सूओझी यांनी ही विधेयके मांडली.

“लाखो किंवा त्यापेक्षा अधिक उईगुर आणि अन्य मुस्लिम अल्पसंख्यकांना ‘राजकीय शिक्षण’ शिबिरांमध्ये ठेवण्यासोबतच मानवी हक्कांचे उल्लंघन आणि मानवतेविरूद्ध संभाव्य गुन्हेगारीसाठी अमेरिकेने चिनी सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरले पाहिजे,” असे रुबीओ म्हणाले.

“चीनमधील उईगुर नागरिकांचा धर्माच्या आधारावर करण्यात येणारा छळ धोकादायक आहे. झिनजियांग प्रांत हे पोलिस राज्यापेक्षा जराही कमी नाही,” असे सूओझी म्हणाल्याचे सीएनएन वाहिनीने म्हटले आहे.

Leave a Comment