टीम इंडियाने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली

team-india
मेलबर्न – भारताने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात केली आहे. भारताने याचसोबत 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे, भारताने कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले आहे. ऑस्ट्रेलियातला भारताचा हा पहिलाच एकदिवसीय वन-डे मालिका विजय ठरला असल्यामुळे भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. महेंद्रसिंह धोनीने 87 तर केदार जाधवने 61 धावांची खेळी केली. चौथ्या विकेटसाठी या दोघांनीही शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन-सिडल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

भारताने तिसऱ्या सामन्यात संधी मिळालेल्या फिरकीपटू युझवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर धडाकेबाज सुरुवात केली. 230 धावांवर ऑस्ट्रेलियाला रोखण्यात भारतीय संघाला यश आले. सामन्यात युझवेंद्र चहलने 6 बळी घेत भारताचे पारडे जड राखण्यात मोठी भूमिका बजावली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्विकारलेल्या भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा यांनी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. मात्र शॉन मार्श माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. ऑस्ट्रेलियाची मधली फळी युझवेंद्र चहलने आपल्या भेदक माऱ्याने कापून काढली. पिटर हँडस्काँबने मधल्या फळीत भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत अर्धशतक झळकावले. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारसा तग धरु शकले नाहीत. अखेरीस 230 धावांत ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला.