हेल्मेट घातले नाही म्हणून कार चालकाकडून आकारला दंड

challan
पुणे : हेल्मेट सक्तीची कारवाई पुण्यातील वाहतूक पोलिसांनी भलतीच मनावर घेतली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पुण्यातील वाहतुक पोलीस हेल्मेट न घालणाऱ्या चारचाकी किंवा रिक्षा चालकांनाही सोडत नाहीत, असेच म्हणावे लागेल. कारण पोलिसांनी आधी रिक्षाचालक आणि आता चारचाकी चालकाला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावला आहे.

पुण्यातील प्रसाद तुळजापूरकर नावाच्या व्यक्तीवर पुणे वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घातल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे. पण चारचाकी चालवताना हेल्मेट न घातल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रसाद तुळजापूरकर यांचे नाव आणि गाडीचा नंबरही दंडाच्या पावतीवर देण्यात आला आहे.

500 रुपयांचा दंड प्रसाद तुळजापूरकर यांना ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या चलानवर हेल्मेट न घातल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहेत. याशिवाय त्यांच्या चारचाकी गाडीचा नंबरही त्यामध्ये लिहिण्यात आला आहे.

1 जानेवारीपासून पुणे शहरात दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती लागू झाली असून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. पुणेकरांचा विरोध होत असतानाच वाहतूक पोलिसांचा हा कारभार पुढे आला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पुणे शहरात दररोज आठ ते दहा हजार लोकांवर हेल्मेट न घातल्याची कारवाई केली जात आहे. अनेक संघटना आणि पुणेकर या हेल्मेट सक्तीला विरोध करत आहेत. यामध्ये वाहतूक शाखेचा हा एक नवीन गोंधळ समोर आला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment